जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतील पक्षांनी महराषट्र बंद पुकारला. या बंदला महाराष्ट्रात काही ठिकाणी कडकडीत तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी बंदला गालबोट लागल्याचे प्रकार समोर येत आहेत.
वरणगाव (ता.भुसावळ) शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले असून जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं शांततेमध्ये सांगत असताना भाजपाचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाद झाल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर भाजपचे शहराध्यक्ष सुनील महाडीक यांनी आम्ही व्यापाऱ्यांना दुकान बंद करु नका; असे सांगत शहरामध्ये फिरत असताना अचानक जमावाने आमच्यावर हल्ला केल्याचे सांगितले आहे.






