ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : मीरारोड येथील एका विधवा महिलेनं आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी बचत करून ठेवलेले पैसे एका ओळखीतील व्यक्तीने हडपले आहेत. आरोपीनं म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ३२ लाख ४६ हजार रुपयांची या निराधार विधवा महिलेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं मीरारोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मातेश्वर राजपत गिरी (वय ४०) वांद्रे येथील एमआयजी कॉलनीतील रहिवासी असणारा हा आरोपी फिर्यादी सावित्री कोयारी या महिलेच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. सावित्री कोयारी मीरारोड परिसरातील रहिवासी आहेत. आरोपीनं फिर्यादीकडून म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ५१ लाख ५० हजार रुपये घेतले होते.पण आरोपीनं गुंतवणूक केल्याचे कोणतीच कागदपत्रे फिर्यादीला दिली नव्हती.
दरम्यान, फिर्यादी सावित्री यांनी गुंतवणूक केलेली रक्कम आरोपीकडे मागितली पण आरोपीनं टोलवाटोलवी करायला सुरुवात केली. फिर्यादीनं पैशांसाठी तगादा लावल्यानंतर आरोपीनं थोडी थोडी करत काही रक्कम परत दिली. पण उर्वरित ३२ लाख ४६ हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेनं नया नगर पोलीस ठाण्यात आरोपी मातेश्वर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. फिर्यादी सावित्री कोयारी यांचे पती आणि भाऊ यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे पतीच्या विम्याचे पैसे सावित्री यांना मिळाले होते. या रकमेतून त्यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती. तर २०१८ साली आरोपी मातेश्वर याने आपण म्युचुअल फंडात काम करत असल्याचं सांगत, येथे गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, असं आमिष दाखवलं. पीडितेनं आरोपीवर विश्वास ठेवून ५१ लाख रुपयांची रक्कम आरोपीला चेक आणि एनएफटीद्वारे दिली होती. पण आरोपीनं त्यांची फसवणूक केली आहे.






