दुचाकी-डंपरच्या अपघातात १८ वर्षीय तरुण ठार

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : कचरा भरुन निघालेल्‍या डंपरला भरधाव दुचाकीने बाजूने दिलेल्‍या धडकेत ओंकार दिनकर मुगडे (वय १८, रा. काळजवडे, ता. पन्‍हाळा) हा तरुण जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले शिवाजी विकास नेमणे (वय १८, रा. कांटे, शाहूवाडी) व करण पाटील (रा. काळजवडे, पन्‍हाळा) गंभीर जखमी झाले.

मंगळवारी मध्‍यरात्री शाहूपुरी पाचव्‍या गल्‍लीत हा अपघात घडला. याबाबत डंपर चालक सतीश रामराव देवेकर (रा. मंगळवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी सतीश देवेकर हे महापालिकेच्‍या कचरा डंपरवर चालक म्‍हणून काम करतात. मंगळवारी मध्‍यरात्री एकच्‍या सुमारास ते कचर्‍याचा डंपर घेवून गोकूळ हॉटेलकडून गवत मंडईकडे निघाले होते. पटेल स्‍पेअरपार्टजवळ डंपर आला असता नाईक ॲन्‍ड नाईक कंपनीकडून पाचव्‍या गल्‍लीतून भरधाव आलेल्‍या दुचाकीने डंपरच्‍या इंधन टाकीजवळ जोराची धडक दिली.

देवेकर यांनी डंपरमधून उतरुन पाहिले असता तिघे तरुण जखमी अवस्‍थेत दिसले. त्‍यांनी जखमींना अग्‍मिशमन वाहनाच्‍या मदतीने तत्‍काळ उपचारासाठी सीपीआरमध्‍ये आणले. ओंकार मुगडेच्या डोक्‍याला, छातीला गंभीर दुखापत झाल्‍याने अंतर्गत रक्‍तस्‍त्राव होवून त्‍याचा उपचारापुर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here