उमराणा बाजार समितीत आवक सुरु; मुहूर्ताची खरेदी ५०५१ रुपयांनी
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) : देशांतर्गत सर्व प्रमुख शहरांमध्ये खरीप आणि रब्बी कांद्याला चांगली मागणी असल्याने कांद्याला सद्यपरिस्थितीत चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, दलाल हे आपल्याकडील साठवून ठेवलेल्या कांद्याची काळजी घेत, आवश्यकतेनुसार कमीत कमी कांदा बाजारात आणत आहेत.
भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी चाळीत साठवलेला कांदा दिवसेदिवस खराब होतो आहे. चाळीतील ४०% कांदा अतिवृष्टी व बदलत्या हवामानामुळे खराब होत असल्याने एकीकडे भावातील सुधारणा व दुसऱ्या बाजूला चाळीत साठवलेला कांदा सडण्याचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांच्या चेहऱ्यावर” कभी खुशी कभी गम”चे भाव दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक बातम्या स्वतःहून पसरवण्यापेक्षा सकारात्मक विचार करत साठवलेल्या कांद्याची नियोजनबद्ध विक्री सुरू ठेवावी. एक दोन बाजार समित्यांमध्ये भाव कमी झाल्यास घाबरून जाऊ नये.
संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय भाव मिळतोय ? हे बघणे जास्त महत्वाचे आहे. पुढील दोन अडीच महिने कांदा उत्पादक शेतक-यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने थोडा थोडा कांदा विक्रीकरीता आणावा, असे आवाहन कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव यांनी केले आहे.







