डोंगरगाव येथे कापसाच्या ढिगामध्ये गुदमरून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील डोंगरगाव येथे खेळताना कापसाच्या ढिगात अडकून गुदमरून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कृष्णा योगेश पाटील (वय ११) असे या चिमुकल्याचे नाव असून, कृष्णा हा त्याच्या आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कृष्णाचे आई- वडील कामासाठी शेतात गेले होते. घरात कृष्णा एकटा होता. तो कापसाच्या ढिगाऱ्यावर खेळत होता. त्याने कापसाच्या ढिगात खड्डे केले होते. मात्र खेळता-खेळता त्याचा तो तोल जाऊन त्या खड्यात डोक्यावर पडला आणि त्याला बाहेर निघता आले नाही. बराच काळ अडकून पडलेल्या कृष्णाचा कापसाच्या गाठीमध्ये गुदमरल्याने मृत्यू झाला.

शेतातील काम संपवून त्याचे आई- वडील घरी आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. मात्र त्यांना यायला उशीर झाला होता. कृष्णा अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे संपूर्ण डोंगरगावामध्ये ही बातमी पसरताच गावात एकच शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here