ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कल्याण पूर्वेतील एका हॉटेलमध्ये एक कामगार समोसा तयार करण्यासाठी लागणारी मैदाची पुरी लाटून ती समोसा, पुरी तळणाऱ्याच्या घामाने भरलेल्या उघड्या मांडीवर ठेवतानाचा किळसवाणा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मराठा एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिसांकडे धाव घेऊन कारवाईसाठी लेखी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी (दि.१७) मराठी एकीकरण समितीची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व कार्यकर्त्यांना अल्पोहार म्हणून समोसा, व्हेफर्स, पेढा देण्याचे ठरले होते. त्यानुसार मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्याने कल्याण पूर्वेतील काटेमानेवली येथील शंकर हॉटेलच्या मालकाला आर्डर दिली होती. बैठक संपल्यावर कार्यकर्ते समोसे आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना समोसा तयार करणाऱ्या एक कामगार पुरी लाटून तीच पुरी समोसा बांधून तळणाऱ्याच्या मांडीवर ठेवून समोसा तयार करत असल्याचे दिसून आले. यामुळे मराठी एकीकरण समितीने हॉटेल मालकाला दिलेली आर्डर रद्द करून किळसवाणा प्रकाराचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केला.
या प्रकाराबाबत समितीचे पदाधिकारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना पोलिसांनी ठाण्यातील अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला. आजवर अशाप्रकारचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर काही दिवस चर्चा होऊन संबधीतावर कारवाई करण्यात येते. मात्र, खाद्यपदार्थाबाबतचे किळसवाणे प्रकार थांबताना दिसत नाहीत.






