मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीचा विमानातच विनयभंग केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी गाझियाबाद येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री दिल्लीहून मुंबईला येत होती. विमान जेव्हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं. अभिनेत्री तिची बॅग बाहेर काढण्यासाठी ओव्हरहेड स्टोरेज उघडण्यासाठी उठली होती. दरम्यान आरोपीनं पीडित अभिनेत्रीला अश्लील स्पर्श केले आहेत. हे प्रकरण घडताच अभिनेत्रीनं लगेच केबिन क्रूकडे तक्रार केली. यावेळी अभिनेत्रीने संताप व्यक्त करताच, आरोपीनं लगेच माफीही मागितली.
यानंतर, या संतापजनक घटनेची माहिती फ्लाइट क्रूने सहार विमानतळ पोलिसांना कळवली. पीडित अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.






