नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे नामकरण करण्याचा सोहळा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेने या कार्यक्रमाचे मोठे होर्डिंग्ज लावले होते. या होर्डिंगवर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे छायाचित्र नसल्याने चर्चेला सुरुवात झाली.
या होर्डिंगवर बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्यांसाह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे आहेत. स्वतः नाशिकरोडचे सभापती प्रशांत दिवे यांचा ही मोठी फोटो आहे मात्र मुख्यमंत्रीचा फोटो मात्र गायब आहे. विशेष म्हणजे रुग्णालयाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं होते. मात्र या कार्यक्रमाला महापौर, आयुक्त यांची ही अनुपस्थिती होती.
येथील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकमध्ये दोन दिवस विविध विकासकामांचे उद्घाटन व शिवसैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून, ही सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वीच केली आहे.






