नाशिक (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातल्या कुमावतनगरमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करताना काडीपेटी पेटवल्यावर गॅसचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात ६ कामगार भाजले आहेत. यातील दोन कामगार ९० टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, सहा कामगार कुमावतनगरमध्ये एकत्रित राहत होते. हे सर्व कामगार परराज्यातले असून टाइल्स बसवण्याचं काम करतात. शुक्रवारी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करत होते. त्यावेळी त्यांच्यातल्या एकानं काडीपेटीची काडी पेटवली. त्याचवेळी गॅस सिलिंडरचा भडका उडला आणि मोठा स्फोट झाला.
स्फोट होताच संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटात लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, वीरेंद्रकुमार (सर्व रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यातले दोघे कामगार ९० टक्के भाजलेत. या स्फोटाप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस गळतीमुळे जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यात १३ जणांचा बळी गेला आहे.







