मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तो लवकरच ‘थलपती 66’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता अनन्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई-गोवा क्रूझवरील अंमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली. गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तो तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. दरम्यान, आर्यन खान आणि अनन्या पांडे या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या पांडेची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. त्यानंतर आता अनन्याला ‘थलपती 66’ या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
अनन्याने ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात दिसली होती. तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले आहे. ती ‘खाली पीली’ या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘Liger’ या चित्रपटात दिसणार आहे.






