मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) ; सरकार हम से डरती है… ईडी को आगे करती है…अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेरचा परिसर दणाणून टाकला. भाजपमध्ये प्रवेश केलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे, कृपाशंकर सिंह यांच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
भाजपचे किरीट सोमय्या ईडी कार्यालयात गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हातात ईडी व भाजपच्या निषेधाचे फलक होते. ईडीचे कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.
किरीट सोमय्या सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करीत असल्याने आम्ही ईडी कार्यालयाच्या बाहेर ‘किरीट सोमय्या जबाब दो’ हे आंदोलन केल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण म्हणाले. किरीट सोमय्या हे भाजपचे दलाल आहेत. पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या काही नेत्यांवर याच किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. ते नेते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्या विरोधातील तक्रारींचे काय झाले. भाजपमध्ये गेल्यावर चौकशी थांबते का, याची माहिती सोमय्यांनी लोकांना द्यावी, असे सूरज चव्हाण म्हणाले.






