मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : पूर्व अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात मलनिस्सारण वाहिनीच्या मॅनहोलवरील झाकणे चोरीला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मलनिस्सारण वाहिन्या स्वच्छ करण्यासाठी व नियमित तपासणी करण्यासाठी ठरावीक अंतरावर मॅनहोल आणि त्यावर झाकणे दिलेली असतात. या वाहिन्या 15 ते 25 फूट खोल असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडी मजबूत झाकणे बसवलेली असतात. या दर्जेदार झाकणाची किंमत बारा हजार रुपये असते. त्यामुळेच चोरटय़ांनी या झाकणांना लक्ष्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरी पूर्व विभागात २० ते २५ झाकणे चोरीला गेली आहेत. झाकणांची ही चोरी पहाटेच्या सुमारास होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. चोरटे रिक्षा किंवा अन्य वाहनातून येऊन झाकण चोरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पालिकेने याला आळा घालण्यासाठी पोलिसांत तक्रार केली आहे. यानुसार पालिकेने सीसीटीव्ही फुटेजसह तक्रारी दाखल केल्यानंतर आता एमआयडीसी पोलीस ठाणे व सहार पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






