अहमदनगर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने नगर शहरात चोरीचे प्रकार वाढत चालले असताना आज कोतवाली व तोफखाना पोलिसांनी नगर शहरातील जिल्हा बँकेच्या जवळ असणाऱ्या एचडीएफसीच्या बँकेत पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने सिने स्टाइल ने कारवाई करत गुजरातमधील सहा आरोपींना रंगेहात पकडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . दरम्यान, या टोळीकडून नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होणार आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये जिग्नेश दिनेश घासी (वय ४२), अजय उत्तम माचरेकर (वय ४५), राकेश बन्सी बंगाली (वय ४५), दीपक भिसभाऊ इन्द्रेकर (वय ३०), मयूर दिनेश बजरंगे (वय ३३), राजेश हरिभाई टमायेचे (वय ४९, सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) यांचा समावेश आहे.
मागील महिन्यामध्ये नगर शहरामध्ये तोफखाना व कोतवाली पोलिसांच्या हद्दीमध्ये अनेक चोऱ्या झाल्या आहेत. बँकेतून पैसे काढल्यानंतर पाळत ठेवून लूटमार करणारी टोळी कार्यरत झालेली होती. पोलिसांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी चार ते पाच पथके पाठवलेली होती. तपासाच्या अनुषंगाने काही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. सदरची टोळीही परराज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे सुरू केले होते.
तोफखाना व कोतवाली पोलिसांना काल माहिती मिळाली की चोरटे हे नगर जिल्ह्यामध्ये आले आहेत. त्यानुसार काल रात्रीपासूनच त्या आरोपींचा शोध सुरू झाला होता. स्टेशन रोडवरील एचडीएफसी बँकेच्या आवारामध्ये हे चोरटे आले असल्याचे आज सकाळी समजल्यानंतर तोफखाना व कोतवालीचे पोलीस साध्या गणवेशात तीन जण बँकेच्या आवारामध्ये थांबलेले होते व बाहेरच्या बाजूला पोलीस दबा धरून होते.
सकाळी साडेदहाच्या सुमाराला बँक सुरू झाल्यानंतर या चोरट्यांनी कोणकोण कशा पद्धतीने पैसे काढतो व कुठे घेऊन जातो याची नजर ठेवत होते, त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आत मध्ये असलेल्या तीन पोलिसांनी बँकेमध्ये चार जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना मोठ्या शिताफीने पकडून ठेवले व बाहेर दोन जण हे होते त्यांना सुद्धा सापळा रचून त्याठिकाणी पोलिसांनी त्यांना पकडले हे सर्व प्रकार व्हिडिओ कॅमेरा मध्ये व सीसीटीवी फुटेज मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. या चोरट्यांकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले असून त्यात दुचाकी या नगर जिल्ह्यातीलच आहे असे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. या गाड्या त्यांनी चोरून आणल्या असाव्यात अशी शक्यता आहे.
यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे व तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी समक्ष एचडीएफसी बँकेच्या आजूबाजूला पोलीस पथकाद्वारे पाळत ठेवून त्यांना मोठ्या शिताफीने पकडले. नगर शहरामध्ये याअगोदर सावेडी भागांमधून तीन मोठ्या चोऱ्या झालेल्या होत्या, यामध्ये लाखो रुपयांची रक्कम चोरीला गेली होती तर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन घटना या मागच्या महिन्यांमध्ये झालेल्या होत्या. आता पकडलेल्या आरोपींकडून नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. हे सर्व आरोपी गुजरातमधील आहेत.






