समीर वानखेडेंसह नवाब मलिकांचीही न्यायालयीन चौकशी करण्याची प्रसाद लाड यांची मागणी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडेंवरील आरोपांवर एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचे म्होरक्या नवाब मलिक असल्याची टीका करत त्यांचीही न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नवाब मलिक ड्रग्ज माफियांना पाठीशा घालत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे जर खरं खोटं करायचे असेल तर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह मलिकांचीही निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी अशी मुख्यमंत्र्यांकडे प्रसाद लाड यांनी मागणी केली आहे.

प्रसाद लाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, नवाब मलिक या सर्व प्रकरणाची म्होरक्या आहेत. सातत्याने ड्रग्ज माफियांना मागे घालण्याचे काम नवाब मलिक करत आहेत. एसआयटी चौकशी लावायची असेल तर सरकार त्यांचे आहे ते तात्काळ लावू शकतात. परंतु नवाब मलिक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, चौकशी लावायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची ३ जणांची समिती बनवून ती चौकशी करावी मग दूध का दूध आणि पाणी का पाणी, खरं की खोटं हे जगासमोर येईल.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईवर नवाब मलिकांनी अनेक आरोप केले आहेत. मलिकांवर आणि वानखेडेंवर तक्रारी दाखल झाल्या असून मुंबई पोलीसांचे विशेष पथक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वानखेडेंवर २५ कोटी खंडणीचे आणि गैरप्रकारे कारवाई केली असल्याचा आरोप केले आहेत. याची चौकशी करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त न्यायाधीशांची ३ जणांची समिती बनवून चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here