विज्ञानप्रसार हा ध्यास व्हावा :डॉ राम ताकवले
पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : प्रतिभाशाली भौतिक शास्त्रज्ञ,विज्ञानप्रसारक आणि भारतीय विद्या भवनच्या ‘मुक्तांगण’ विज्ञान संशोधिकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ.शंकरराव गोवारीकर यांच्या जीवनावरील ‘आदरांजली’ स्मृती ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ.राम ताकवले, ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ.शां.ब.मुजुमदार,डॉ प्रमोद काळे,गोवारीकर यांची नातवंडे केतकी गोवारीकर-जोशी,जय गोवारीकर,सुधांशु पाईन,नातजावई संदीप जोशी यांच्याहस्ते झाले.हा कार्यक्रम ३० ऑक्टोबर रोजी भारतीय विद्या भवन(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
यावेळी दिवंगत डॉ गोवारीकर यांच्या पत्नी श्रीमती वासंती गोवारीकर यांनी भारतीय विद्या भवनच्या शिवाजीनगर व कोथरूड येथील शाळांमधील विज्ञान प्रयोगशाळाना मिळून 5 लाख रुपये देणगी दिली. या प्रयोग शाळांना ‘डॉ.शंकर आर.गोवारीकर विज्ञान प्रयोगशाळा’ असे नाव देण्यात आले आहे.कार्यक्रमाला वासंती गोवारीकर, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राच्या अध्यक्ष डॉ लीना मेहेंदळे,संचालक प्रा नंदकुमार काकिर्डे तसेच डॉ गोवारीकर यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
डॉ राम ताकवले म्हणाले,’डॉ.शंकरराव गोवारीकर हे दुर्लक्षित विषयात नाविन्यपूर्ण संशोधन करणारे संशोधक होते.त्यांचे विज्ञान प्रसाराचे काम व्यापक होते.संशोधनाचा सतत आग्रह धरताना स्वतःच्या योगदानाची वाच्यता करण्याचा स्वभाव नव्हता.त्यांचे कार्य जगासमोर आले पाहिजे आणि विज्ञानप्रसार हा ध्यास झाला पाहिजे.’ डॉक्टर राम ताकवले यांनी सांगितले की केंद्र सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात डॉक्टर शंकर गोवारीकर यांनी केलेल्या अनेक सूचनांचा समावेश केलेला आहे.
डॉ.शां.ब.मुजुमदार म्हणाले,’डॉ गोवारीकर यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून विज्ञान चळवळ,उपक्रम पुढे नेले.गोवारीकर कुटुंबियांमधील प्रतिभा पाहता,अशा काही ठराविक कुटुंबांच्या जनुकात मोठ्या प्रमाणावर प्रतिभा असते,त्याचेही कोणीतरी संशोधन केले पाहिजे,असे वाटून जाते.डॉ गोवारीकर यांना शिक्षण क्षेत्रात केवळ बदल नको होते तर क्रांती अपेक्षित होती.त्यांचे विचार आणि कार्य या स्मृतिग्रंथातून पुढे येत आहे,ही अतिशय महत्वाची बाब आहे’.
डॉ.प्रमोद काळे यांनीही डॉ गोवारीकर यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या भाषांतून उजाळा दिला.दिवंगत डॉ गोवारीकर यांच्या पत्नी वासंती गोवारीकर यांनी प्रास्ताविक केले.नमा जोशी , शर्मिला पाईन यांनी मनोगत व्यक्त केले.सुब्रतो यांच्यासह डॉ गोवारीकर यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.प्रा.आरती दातार यांनी सूत्रसंचालन केले .






