कोल्हापूर (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर सतीश चव्हाण) : मंगळवारी कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी, आगामी २०२१-२२ या वर्षासाठीच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून चालू वर्षाच्या व कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.
कोरोना प्रादुर्भावावरील उपयोजनकरिता एकूण अर्थसंकल्पित निधीच्या ३०% निधी रु. ८२६८ लाख पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली असून खालील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (CPR), इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, गडहिंग्लज, गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय मुरगूड, राधानगरी, मलकापूर, आयसोलेशन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट स्थापित करण्यात येत आहेत.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे बालरोग अतिदक्षता विभाग स्थापन करणे, बालरुग्णामध्ये होणाऱ्या संभाव्य धोक्याच्या उपाय योजनेकामी तसेच, कान-नाक घसाशास्त्र विभागासाठी कोविड-१९ व म्युकर मायकोसिस प्रदूरभावावरील उपयोजनांकरिता आवश्यक यंत्रसामुग्री व साधनसामुग्री उपलब्ध करणे. याचसोबत, खालील महत्वाच्या नाविन्यपूर्ण योजनांना मान्यता देण्यात आली आहे.
‘सिटीझन ३६०’ शासनामार्फत राबविण्यात येत असणाऱ्या जनकल्याणाच्या विविध योजनांची कार्यक्षमता, परिमाणकरता तपासणे, प्राप्त माहितीचे संकलन करून विश्लेषण करावे व त्याचा अभ्यास करून योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आधुनिक संगणक प्रणाली विकसित करणे. शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाचा (Developement of Application AR/VR Technology for school education) वापर करणे. घाटमाथ्यावर असणाऱ्यांचा जीवनमान उंचावण्यासाठी स्वयंपूर्णतेच्या दृष्टिकोनातून शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘वनअमृत योजना’ राबविणार. ग्रामपंचायत बालिंगे येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प स्थापन करण्यात येणार. तसेच, जिल्ह्यातील हनुमान मंदिर, भडगाव ता. कागल आणि लखमेश्वर मंदिर ता. आजरा यांना ‘क’ वर्ग यात्रास्थळ म्हणून आणि कोल्हापुरातील राजाराम तलावाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
याचसोबत, जिल्ह्यातील डोंगराळ भाग, वाड्या-वस्त्यांमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये वीजेचा होणारा खर्च कमी करण्यासाठी सर्व शासकीय इमारांतींमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत टप्याटप्याने राबविण्यात येणार आहे. शेती-पिके विजेअभावी वाळणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना वीज महामंडळाला यावेळी देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना कोणत्याही संकटाच्या वेळी तात्काळ पोलीस साहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘डायल ११२’ या महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांची 100 वाहने (दुचाकी-चारचाकी) पोलीस विभागाला देण्यात येणार. तसेच, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात अभयगात कक्ष उभारण्यासाठी रु. 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या शाळांना 100 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा शाळांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावा. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या शाळांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत जनजीवन पूर्वपदावर येत असताना या संकटामुळे प्रलंबित कामे अधिक जोमाने आणि तत्परतेने करण्यावर भर देण्यात येणार असून जिल्हयातील आरोग्य सुविधा सुद्धा अधिक सक्षम करण्यावर आमचा जोर आहे.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबवून कोल्हापूरचा विकास करण्यासंदर्भात यावेळी सर्वांगीण चर्चा झाली असून सर्वच लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोल्हापूरला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.






