हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील व्हा ! – आमदार श्री. टी. राजासिंह

विविध ठराव पारित करून नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न !
जळगाव (संपादक सुनिल पाटील) –  तिहेरी तलाकवर बंदी, कलम 370 रहित करणे आणि श्रीराममंदिराचे निर्माण या 3 गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. आता अजून 3 शिल्लक आहेत. त्या म्हणजे काशी येथील विश्‍वनाथ मंदिर आणि मथुरा येथे श्रीकृष्ण मंदिर यांची उभारणी आणि शेवटी अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना ! अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ बोलण्याने होणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा मार्ग अनुसरावा लागेल. हिंदु राष्ट्रामध्ये ‘गोहत्या’, ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात असणार नाहीत. हिंदूंनी जागृत आणि संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा तेलंगाणा येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या समारोपीय सत्रात बोलत होते. हे अधिवेशन समितीच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि ‘फेसबूक पेज’द्वारे 64 हजारहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिले, तर 2 लाख 47 हजाराहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला.
या वेळी अयोध्येच्या ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराजही उपस्थित होते. ते म्हणाले की, भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदु साम्राज्याची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर मात्र सत्तेवर येणार्‍यांनी हिंदुविरोधी विचारधारा जपली; मात्र यापुढे हिंदु राष्ट्र अबाधित राखणे, हे प्रत्येक हिंदूचे दायित्व आहे. त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे राजकारणाचे हिंदूकरण होणे आवश्यक आहे. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले की, ‘माझ्या भक्तांचा नाश कधीही होणार नाही’, असे भगवंताचे वचन आहे. राज्यकर्ते साधनसामग्रीने संपन्न असले, तरी ते जनतेचे रक्षण करू शकत नाहीत, हे आपण अनुभवत आहोत. ईश्‍वर मात्र भक्ताच्या हाकेला धावून येतो. त्यामुळे येणार्‍या आपत्काळातही आपले रक्षण होण्यासाठी स्वत: ईश्‍वराचे भक्त बना आणि अन्यांनाही साधना करण्यासाठी सहकार्य करा !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘सध्याच्या आपत्काळात जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. कोरोना महामारीनंतर चीनविरुद्ध अनेक देश एकवटले आहेत. विश्‍वयुद्ध चालू झाले की, दिल्ली दंगल, शाहीनबाग आंदोलन, सीएएच्या विरोधातील हिंसक आंदोलनाप्रमाणे भारतविरोधी शक्ती जाती-धर्म यांच्या नावावर गृहयुद्ध भडकवण्याचे षड्यंत्र रचण्याची शक्यता आहे. या भावी अराजक परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी अग्नीशमन, प्रथमोपचार, आपत्कालीन साहाय्य, नागरी संरक्षण आदी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. कालमहात्म्यानुसार वर्ष 2023 मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्यासाठी योगदान देणे, ही साधनाच आहे.’
या अधिवेशनामध्ये राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या विविध विषयांवर कृती कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी ‘ऑनलाइन’ गटचर्चाही घेण्यात आली. यासाठी विविध राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांचे वेगवेगळे 16 गट करून ‘ऑनलाइन’ चर्चांमध्ये शेकडो हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. अधिवेशनाअंती हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने काही ठरावांचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा (महाराष्ट्र) समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. या ठरावांना ‘हर हर महादेव’चा जयघोष करत, तसेच ‘कमेंट बॉक्स’मध्येही ‘हर हर महादेव’ पोस्ट करत सर्वांनी अनुमोदन देत ठराव संमत करण्यात आले.
ऑनलाईन ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त संमत झालेले ठराव !
1. अयोध्येत निर्माण होणारे श्रीराममंदिर हे हिंदूंसाठी धर्मशिक्षण देणारे व्हावे. येथील अन्य मंदिरे आणि ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणेही आक्रमणमुक्त करून त्यांचा जीर्णोद्धार करावा. धार्मिक असंतोष टाळण्यासाठी अयोध्येत अन्य धर्मियांच्या धार्मिक बांधकामास अनुमती देऊ नये.
2. हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट 1991’ हा कायदा त्वरित रहित करून राममंदिराप्रमाणेच काशी, मथुरा आदींसारखी मोगल आक्रमकांनी बळकावलेली हिंदूंची हजारो मंदिरे आणि त्यांची भूमी हिंदूंच्या ताब्यात द्यावी.
3. सर्वांना समान अधिकार देण्यासाठी संविधानातील ‘सेक्युलर’ शब्द वगळून तेथे ‘स्पिरिच्युअल’ शब्द घालावा आणि भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे.
4. ‘नेपाळ हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, या नेपाळ येथील हिंदूंच्या मागणीचे हे अधिवेशन संपूर्ण समर्थन करते.
5. हिंदु समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन केंद्रशासनाने ‘संपूर्ण देशात गोवंश हत्या बंदी’ आणि ‘धर्मांतरबंदी’ यांच्या संदर्भात निर्णायक कायदे संमत करावेत.
6. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवरील अत्याचारांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि भारत शासन यांच्याद्वारे चौकशी करून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा द्यावी.
7. काश्मीर खोर्‍यात स्वतंत्र ‘पनून कश्मीर’ या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करून विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनश्‍च पुनर्वसन करण्यात यावे.
8. तामिळनाडूतील श्री नटराज मंदिराचे अधिग्रहण रहित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरातील मंदिरांचे शासकीय अधिग्रहण तत्काळ रहित करून मंदिरे भक्तांच्या हाती सोपवावीत.
9. केंद्रशासनाने तत्काळ ‘केंद्रीय नामकरण आयोगा’ची स्थापना करून देशभरातील नगरे, वास्तू, रस्ते, संग्रहालये इत्यादींना असलेली परकीय आक्रमकांची नावे बदलून त्यांचे मूळ नावानुसार नामकरण करावे.
10. ‘वेबसिरीज’च्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, संत आदींचा सातत्याने होत असलेला घोर अवमान, मोठ्या प्रमाणावर होणारा अश्‍लीलता आणि हिंसा यांचा प्रसार लक्षात घेऊन शासनाने ‘वेबसिरीज’ना ‘सेन्सॉर’ करावे. तसेच या माध्यमातून हिंदु धर्म आणि देवता यांच्या होणार्‍या अवमानाच्या विरोधात कठोर कारवाईसाठी विशेष कायदा त्वरित संमत करावा.
11. राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने भारतात आश्रय दिलेल्या रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवण्यासाठी सरकारने कायदा करावा.
12. देहली दंगलीचे सूत्रधार आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसेन, तसेच ‘सीएए’ आणि ‘एन्आर्सी’ या कायद्यांच्या विरोधात शाहीनबागसारखी हिंसक आंदोलने करणारे यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा.
13. गेल्या काही वर्षांत अहिंदूंच्या लोकसंख्येचा विस्फोट पहाता सर्व धर्मियांच्या लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी देशात त्वरित ‘जनसंख्या नियंत्रण कायदा’ लागू करण्यात यावा.
14. भारतात ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ आणि ‘एफ्.डी.ए.’ यांसारख्या शासकीय संस्था असतांना धार्मिक आधारावर ‘समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण करणारी ‘हलाल सर्टिफिकेशन’ची व्यवस्था त्वरित बंद करावी.
15. विरोधात कोणतेही पुरावे नसतांना कारागृहात खितपत पडलेल्या सर्व हिंदुत्वनिष्ठांवरील खटले चालवण्यासाठी ‘विशेष जलदगती न्यायालया’ची स्थापना करावी आणि निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना न्याय द्यावा, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here