ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : ठाणे महानगरपालिका, ठाणे व फोटो सर्कल सोसायटी यांच्या सहकार्याने ठाणे महापौर चषक राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेतील छायाचित्रांचे प्रदर्शन २६ ते २८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, ज्ञानसाधना महाविद्यालय रोड, तीनहात नाका येथे भरविण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वा. राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत महापौर श्री. नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
ठाणे महानगरपालिका, ठाणे व फोटो सर्कल सोसायटी यांच्यावतीने १५ ऑगस्ट २०२१ ते २७ सप्टेंबर २०२१ या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ४६०० छायाचित्रकांरांनी प्रवेशिका पाठवून आपला सहभाग नोंदविला. त्यातील १०० छायाचित्रांची विजेती छायाचित्र म्हणून निवड करण्यात आली असून या प्रदर्शनात विजेत्या छायाचित्रांबरोबरच निवडक ३०० छायाचित्रांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायं ६ वा. पारितोषिक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर प्रदर्शन हे कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करुन भरविण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठामपा व फोटो सर्कल सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे.






