पंचवटीतील शिंदे खूनप्रकरणी दोन जण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील पंचवटीतील पेठरोडवर भाजीपाला व्यापारी राजेश शिंदे यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे. या खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीनास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी मधुकर येलमामे (वय २४, रा. वैशाली नगर, पेठरोड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिंदे यांच्या हत्येनंतर गुन्हे शोध पथक हे संशयितांच्या मागावर होते. अटक करण्यात आलेला संशयित रवी येलमामे व अल्पवयीन हे दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे असल्याचे पोलिसांना समजले.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी सापळा रचून या दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेला संशयित रवी येलमामे यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here