जळगावमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सडेतोड उत्तर !
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – शिवसेनेचे उपनेते व महाराष्ट्राचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील हे 24 तास व 365 दिवस जनसेवेसाठी उपलब्ध असतात. शुद्धीत राहून जनतेची कामे केल्यामुळेच भाजपने सर्व रसद पुरवत गद्दारी करून देखील गुलाबराव पाटील यांनी 50 हजारांच्या मतांनी विजयी होत लोकप्रियता सिद्ध केली आहे. स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकत गद्दारीचे व्यसन जडलेल्या नारायण राणे यांच्या निलेश व नितेश या दोन दिवट्यांनी अक्कल पाजळू नये असा जोरदार पलटवार जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे महानगर प्रमुख शरदआबा तायडे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अथवा ठाकरे कुटुंबीयांवर ज्या – ज्या वेळी विरोधकांकडून टीकाटिप्पणी केली जाते त्या-त्यावेळी शिवसेनेचे फायरब्रँड व तडाखेबंद नेते अशी ओळख असलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे विरोधकांना आक्रमक शैलीत प्रत्युत्तर देत असतात.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. ही टीका झोबंल्याने नारायण राणे यांचे आमदारपुत्र नितेश राणे यांनी बडबड करत गुलाबराव पाटील यांच्यावर टिपणी केली होती. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी व शिवसेनेचे महानगर प्रमुख शरदआबा तायडे यांनी नितेश राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला. शारीरिक उंची कमी असणे ही नैसर्गिक व दैवी देणगी आहे. मात्र, गद्दारीमुळे व शिवसेना द्वेषाची कावीळ झाल्याने नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या पिता-पुत्रांची वैचारिक व संस्काराची उंची देखील कमी झाली आहे, असा टोला शरदआबा तायडे यांनी लगावला आहे.
शिवसेनेमुळे राजकारणातील बाजार उठल्यामुळे नारायण राणे यांच्यासह त्यांचे निलेश व नितेश हे दोन पुत्र शिवसेनेवर सातत्याने टीका करत असतात. गुलाबराव पाटील हे मंत्री असून देखील सर्वसामान्यांमध्ये मिसळून आणि दिवस- रात्री कधीही सामान्यांच्या व्यथा, अडचणी ऐकून त्या सोडवत असल्यामुळेच लोकप्रिय आहेत. त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्व प्रकारचा रसद पुरवठा करून बंडखोर उभा केल्यानंतरही गुलाबराव पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. शुद्धीवर राहून जनतेची कामे केल्यामुळेच लोकप्रियता वाढली हे स्वाभिमान गहाण टाकलेल्या राणे पुत्राने लक्षात घ्यावे असा सज्जड दमही भरला आहे. गुलाबराव पाटील निष्ठावंत व कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेने नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदावर पोहोचूनही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकत भाजपच्या वळचणीला आश्रय घेतला आहे. गुलाबराव पाटील यांच्यासारखी निष्ठा बाळगून गद्दारीचे व्यसनही सोडा असा जोरदार पलटवार शिवसेनेचे पदाधिकारी व महानगर प्रमुख यांनी केला आहे.







