नाशिक (विशेष प्रतिनिधी) : दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. सागर गणपत बोडके (२२ रा.फुलेनगर,पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे.
बोडके याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांनी सागरला दोन वर्षासाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
पोलीस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी तो दिंडोरीनाका परिसरात असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली. पथकाने सापळा लावून त्यास जेरबंद केले असून हवालदार योगीराज गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.






