रिक्षेतील सहप्रवाशांनी प्रवाशाचा मोबाइल लांबवला; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : खेडी ते अजिंठा चौफुली या अवघ्या दोन किलोमीटर अंतरात एका रिक्षेत बसलेल्या तीन प्रवाशांनी सहप्रवाशांचा १० हजार रुपयांचा मोबाइल लांबवला. ही घटना ७ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. तर ८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या रिक्षेत चालक, मालकाचे नाव व नंबर असलेले स्टिकर चिकटवलेले नसल्यामुळे लूट झालेल्या प्रवाशाला रिक्षेचा नंबरही लिहून ठेवता आला नाही.

जळगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकार हेमंत शंकरराव काळुंखे (वय ६७, रा. खेडी) दि. ७ रोजी सकाळी ते खेडी येथून एका रिक्षेत बसले. यावेळी रिक्षेत तीन तरुण आधीच बसलेले होते. सुरूवातीला काळुंखे कॉर्नरला बसले होते. काही अंतर पुढे आल्यानंतर तीन तरुणांनी धावत्या रिक्षेत मस्करी करायला सुरूवात केली. हिन्दी भाषेत तिघे एकमेकांशी बोलत होते. याच मस्करीत त्यांनी नंतर काळुंखे यांना मध्यभागी बसायला सांगितले.

याचदरम्यान, तिघांनी त्यांच्या शर्टच्या खिश्यातील मोबाइल काढून घेतला. रिक्षेतून उतरुन अजिंठा चौफुलीच्या पुढे आल्यानंतर काळुंखे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी शोध घेतला परंतु चोरटे मिळून आले नाही. त्यानंतर काळुंखे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र राजपूत तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here