दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : देशभरातील २२ राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच हवामान खात्याने पुढील ४ दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने डोंगर दऱ्यांपासून सागरी किनारपट्टीपर्यंत अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे मुंबई-दिल्लीची अवस्था बिकट झाली आहे. सखल भागांत पाणी साचल्यामुळे या मोठ्या शहरांचा वेग मंदावला आहे.दिल्ली, मुंबई, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळमध्ये पाऊस आणि गडगडाट होत आहे. दिल्लीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुल्लु जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे मणिकर्ण खोऱ्यातील चोज नाल्याला पूर आला असून, त्यामुळे पार्वती नदीच्या काठावर बांधलेली रेस्टॉरंट आणि अनेक घरे वाहून गेल्याची माहिती आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी शिमला जिल्ह्यातील रामपूरमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता.
मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही भागात बस आणि लोकल गाड्यांवर परिणाम झाला आहे. मंगळवारी समुद्रात उंच लाटा उसळल्या. ४ ते ६ मीटर उंच भरतीचा इशारा देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.







