वांद्रे कौटुंबिक न्यायालयाची अग्निरोधक यंत्रणा कुचकामी; बार असोसिएशनचे न्यायाधीशांना पत्र

vandre-family-court-firefighting-system

मुंबई (निवासी संपादक डॉ.सुभाष अंकुश आरोसकर) : वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दररोज वकिलांसह पक्षकार शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहतात, मात्र येथे येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. फॅमिली कोर्टात बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा गंजली असून इतर अग्निरोधक यंत्रणाही कुचकामी झाली आहे. त्यामुळे फॅमिली कोर्टात फायर फायटिंग यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी करत फॅमिली कोर्ट बार असोसिएशनने कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवले आहे.

 

मुलांचा ताबा मिळवणे, पोटगी, घटस्फोट, पालकांना मुलांची भेट घेण्याची परवानगी अशा असंख्य खटल्यांसाठी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात दररोज अनेक खटले दाखल होत असून या खटल्यांसाठी दिवसाला जवळपास अडीच ते तीन हजार नागरिक उपस्थित असतात. २०१४ साला पासून येथील अग्निरोधक यंत्रणा निकामी झाली असून अग्निरोधक साधनांना गंज चढला आहे. याशिवाय ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयात इतर सुविधांचाही बोजवारा उडाला आहे. पाण्याच्या गळतीमुळे इमारतीतील प्लास्टर निखळले असून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच रजिस्ट्रार जनरलच्या निदर्शनास ही बाब अनेकदा आणून दिल्यानंतर उच्च न्यायालय, रजिस्ट्रारकडून आश्वासन देण्यात आले, मात्र अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही.

 

पावसाळय़ात पाणी इमारतीच्या आवारात शिरू नये यासाठी इमारत बाहेरून प्लॅस्टिकने आच्छादित करण्यात आली आहे, मात्र हवा खेळती राहावी अशी सोय नसल्याने इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घुसमट होत आहे. फॅमिली कोर्टात आगीची दुर्दैवी घटना घडू नये तसेच कोणतीही हानी होऊ नये यासाठी फॅमिली कोर्ट बार असोसिएशनने मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठवले आहे. लवकरात लवकर या पत्राची दखल घेण्यात यावी तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here