मुंबई (क्राइम रिपोर्टर महेंद्र कुमार गुप्ता) : मीरा रोड येथे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महिला प्रमुख सुल्ताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी मध्यरात्री हल्ला केला. या हल्ल्यात सुल्ताना यांच्या डाव्या हातावर दुखापत झाली आहे.
याबाबत समजलेले वृत्त असे की, काल रात्री सुल्ताना ह्या त्यांच्या पतीसोबत कारने डॉक्टरांना भेटण्यासाठी जात असताना मीरा रोड येथील नयानगर जवळ दुचाकी वरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी गाडीवर हल्ला केला. एवढेच नाही तर हल्लेखोरांनी यावेळी त्यांच्या पतीलाही शिवीगाळ केली. धारधार शस्त्राने सुल्ताना यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुल्ताना यांच्या हाताला दुखापत झाली त्यानंतर त्यांना तात्काळ त्यांच्या पतीने मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. त्या जबाब देण्याच्या स्थितीमध्ये नसल्याने त्यांची अजून तक्रार नोंद करण्यात आली नाही.
४ जुलैला एका व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला मुंबईच्या पदाधिकारी कडून धमकी येत असल्याचे सांगितले होते. त्यांचा पूर्वीचा व्हिडिओ कुणीतरी डिलीट केल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ना डरी हूँ… ना डरूँगी’ असे सुल्ताना खान यांनी आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटले होते. त्यामुळे या हल्ल्यातील आरोपी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.