मुंबई (क्राइम रिपोर्टर महेंद्रकुमार गुप्ता) : मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सापळा रचून २.६१९ किलो वजन असलेली २ कोटी ६० लाख रुपये किंमतीची अंबरग्रीस – व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.
याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, पोलिसांना एक इसम अंबरग्रीस – व्हेल माशाची उलटी विक्री करण्याचे उद्देशाने ऑबेरॉय हॉटेल समोर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकातर्फे ऑबेरॉय हॉटेलसमोर परिसरात पाळत ठेवण्यात आली.
काही वेळाने मिळालेल्या माहितीप्रमाणे एका संशयित इसमास हटकले असता त्याच्या ताब्यात प्रतिबंधित केलेला अंबरग्रीस व्हेल माशाची उलटी हा पदार्थ मिळून आला. त्याची वन अधिकारी यांनी तपासणी करून खात्री केली असता या अंबरग्रीसचे एकूण वजन २.६१९ ग्रॅम असून, त्याची किंमत २ कोटी ६० लाख रुपये असल्याचे आढळून आले. सदर आरोपीला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे.







