मालाड येथे कर्जवसुलीसाठी मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कर्जवसुलीसाठी रिक्षाचालकाला मारहाण करून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. अपहरणप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी विजय ऊर्फ बबलू चौरसिया, अझरुद्दीन शेख आणि सिराज सलीम शेख या तिघांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष महंतो (रा.मालाड) या भाडय़ाने रिक्षा चालवतो. रिक्षामालकाने काही वर्षांपूर्वी कर्जावर घेतलेली रिक्षा संतोषकडे होती. आर्थिक कारणास्तव कर्जाचे हप्ते भरले गेले नव्हते. सोमवारी नेहमीप्रमाणे संतोष हा रिक्षा घेऊन निघाल्यानंतर सायंकाळी तो मालाडच्या इन्फिनिटी मॉलजवळ आला. तेव्हा विजय, अझरुद्दीन आणि सिराजने त्याला थांबवले. कर्जाचे हप्ते भरले नाही. त्याची वसुली करायची म्हणून त्या तिघांनी रिक्षाची चावी घेतली. त्यानंतर त्या तिघांनी संतोषच्या हातात एक कागद देऊन फोटो काढला. त्यातील एक जण संतोषची रिक्षा घेऊन गेला.

संतोष पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करत असतानाच त्या तिघांनी त्याला दुसऱ्या रिक्षात नेले. मीठ चौकी येथून संतोषला मारहाण करून बोरिवली येथे घेऊन जात असतांना, रिक्षा हळू झाल्यावर संतोष रिक्षातून उतरला. त्याने याची माहिती त्याच्या मालकाला दिली. मालकाने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे याच्या पथकातील उपनिरीक्षक पीयूष तरे यांनी तात्काळ तपास सुरू करत त्या तिघांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here