मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या बहुप्रतीक्षित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीजर नुकतंच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा थ्रिलर टीजर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. सतत या चित्रपटाबाबत विविध अपडेट्स समोर येत असतात. दरम्यान आता चित्रपटाच्या टीजरने आणखीनच उत्सुकता वाढवली आहे.
नुकतंच युट्युबवर ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. या टीजरची सुरुवात अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या सीनपासून होते. हे दोघेही तुरुंगात बसलेले दिसून येत आहेत. यामध्ये सैफ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे तर समोर आरोपीच्या रुपात हृतिक बसला आहे. त्यांच्यातील संवाद फारच रंजक वाटत आहे.
टीजर सुरु होताच हृतिक सैफला म्हणतो एक कथा ऐकवतो, यासाठी लक्ष आणि धीर दोन्ही हवे. यावेळी ही कथा तुम्हाला आश्चर्यचकित करेल. त्यानंतर टीजरची सुरुवात होते. यामध्ये जबरदस्त ऍक्शन थ्रिलर सीन पाहायला मिळत आहेत. सोबतच रावणाचं दहनसुद्धा यामध्ये दाखवण्यात आलं आहे.
वास्तविक ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सर्वांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. साऊथ दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनीच हिंदी रिमेकचं दिग्दर्शन केलं आहे. साऊथ चित्रपटात अभिनेता आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता हृतिक आणि सैफ यांची जोडी पडद्यावर काय कमाल करते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.







