मुंबई (प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : पश्चिम उपनगरातील दिंडोशी येथे लग्नास नकार दिला म्हणून २४ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकरानेच चाकूहल्ला केला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सदर घटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. प्रमिशा उंडारे असे या जखमी तरुणीचे नाव आहे.
पीडित तरुणी आणि आरोपी एकाच परिसरात राहात असून पूर्वी दोघांमध्ये मैत्री होती. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीत दुरावा आला. प्रमिशा आपल्यासोबत बोलत नसल्याने राजेंद्र याला राग अनावर झाला होता. तो प्रमिशाकडे वारंवार लग्नाची मागणी करत होता. मात्र, प्रमिशा त्याच्याकडे कानाडोळा करत होती. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास प्रमिशा ही बोरिवली येथून कामावरून घरी परतत होती. दुर्गावाडी चाळ, देवीपाडा नॅशनल पार्कजवळ प्रमिशा आली असता आरोपी राजेंद्र याने तिची वाट अडवली. त्यावेळी आरोपी राजेंद्र परब याने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. त्यावेळी प्रमिशाने त्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यात प्रमिशा गंभीररित्या जखमी झाली.
या प्रकरणी प्रमिशाने दिलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी आरोपी राजेंद्र विरोधात३०७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे.






