जालना (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अंबड शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल दरोडा पडला. सराफा मार्केटमधील बागडे सराफ या दुकानाच्या भिंतीला भोक पाडून चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने लोखंडी दरवाजा कापला आणि जवळपास साडे आठ लाखांचा माल लंपास केला. पहाटे तीन-साडेतीनच्या दरम्यान पडलेल्या या दरोड्यात चोरट्यांनी सोन्याची चैन, सोन्याचे पेंडल, चांदीची चैन, कडे, जोडवे आदी माल लंपास केला आहे.
या प्रकरणी सराफा दुकानाचे मालक मयूर औदुंबर बागडे यांनी या अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरोड्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८०, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अन्वेषण अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांची नेमणूक केली आहे. दरम्यान, अंबड पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मोठे गॅस कटर, एक लहान गॅस सिलेंडर, लोखंडी रॉड, दोन लोखंडी गिरमिट, कानस व इतर साहित्य जप्त आहे.
या प्रकरणी पोलिसांनी झारखंड राज्यातील मोहम्मद युसुफ अली हयात आली (रा. लकरी टोला अमनत दिआरा. जिल्हा. साहेबगंज) याला ताब्यात घेतले असून आणखी तीन अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.







