पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : कोरेगाव पार्क येथे अवैधपणे सुरु असलेल्या दोन हुक्का पार्लरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने छापा टाकला.
या कारवाईत ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ६ जणांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही कारवाई राजा बहादुर मिल स्टेशन रोड येथील हॉटेल ड्रामा ९ आणि कोरेगाव पार्क लेन नं.७ येथील हॉटेल मोका या ठिकाणी करण्यात आली.
पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील अवैद्यधंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक एकची दोन पथके तयार करण्यात आली होती. एका पथकाने राजा बहादुर मिल स्टेशन रोड येथील हॉटेल ड्रामा ९ येथे छापा टाकून १८ हजार ५०० रुपये किमतीचे हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर जप्त केले. तर कोरेगाव पार्क लेन नं.७ येथील हॉटेल मोका या ठिकाणी छापा टाकून ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हॉटेल मालक, हुक्का पिणारे अशा एकूण ६ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.