मुंबई (उपसंपादक सुरेश पटनायक) : अरबी व उर्दु शिकविण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने चार वर्षाचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी पुर्वमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणात पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर २५ वर्षीय आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलांना अरबी व उर्दु भाषेचे धडे देण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. यावेळी घरातील दिवाणखान्यात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती पीडित मुलांच्या आईला मिळाल्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला राहत्या घरातून शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीडित मुले भाऊ-बहिण असून घरात कोणीही नसल्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलांसोबत अश्लील कृत्य करत होता.






