महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

bribe
FILE PHOTO

मुंबई (उपसंपादक प्रफुल्ल शेलार) । केलेल्या पाईप लाईनच्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून लाच घेणाऱ्या महिला सरपंचासह ग्रामविकास अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत समजलेली माहिती अशी की, गोठेघर ग्रामपंचायत, शहापूर, जि. ठाणे सरपंच रूचिता भालचंद्र पिंपळे (वय २६) आणि ग्रामविकास अधिकारी दिलीप गोविंद इंगळे (वय ५१) यांनी तक्रारदाराला गोठेघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत राईस मिल ते चिंतामणी प्लाझा दरम्यान पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईनचे काम केल्याबद्दल, कामाचे बिल १ लाख २३ हजार १७५ रूपये मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

 

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या दि. २७ जून २०२३ रोजीच्या पडताळणी कारवाईत ग्रामविकास अधिकारी दिलीप इंगळे यांनी ५०० रूपये तर सरपंच रूचिता पिंपळे यांनी २० हजार रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ठाणे अ‍ॅन्टी करप्शनच्या युनिटने सापळा रचला असता दोघांनी सरकारी पंचासमक्ष लाच घेतल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

सदरची कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील यांनी केल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here