ठाणे (जिल्हा प्रतिनिधी एकनाथ पाटील) । आज (दि. १८) सकाळी ६:३० च्या सुमारास मौजे पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनरने कालीपिली टॅक्सीला धडक दिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी साडेसहाच्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर (क्रमांक MH48 T7532) आणि काळी पिवळी जीप (क्रमांक MH04 E1771) विद्यार्थी असलेली पडघावरून खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. यात चिन्मय विकास शिंदे (१५), रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे (२७), संतोष अनंत जाधव (५०), वसंत धर्मा जाधव (५०), प्रज्वल शंकर फिरके यांचा मृत्यू झाला आहे. तर दिलीप कुमार विश्वकर्मा (२९), चेतना गणेश जसे (१९), कुणाल ज्ञानेश्वर भामरे (२२) ही जखमींची नावे आहेत. दरम्यान भिवंडीतील मायरा हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.
मयत झालेल्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोलाचे कार्य केले. दरम्यान मुंबई- नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. तसेच याआधी ही खडवली फाट्याजवळ अनेक अपघात झालेले आहेत. हे लक्षात घेता प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
मृतांमधील प्रज्वल शंकर फिरके हा न्हावी येथील रहिवासी असून तो सध्या मुंबई येथे वास्तव्यास होता. आज सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती येताच परिसरावर शोककळा पसरली आहे.







