ठाणे (जिल्हा क्राईम रिपोर्टर प्रवीण जाधव) : महावितरणच्या वीज देयक तपासणी पथकाने या ग्रामस्थाला वीज देयक भरण्यासाठी तगादा लावला होता. तरीही ग्रामस्थ थकीत वीज देयक भरणा करत नव्हता. अखेर पथकाने त्याच्या घराचा वीज पुरवठा खंडित करताच संबंधित ग्रामस्थाने महावितरणच्या पुरुष कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना निळजे गावात घडली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मानपाडा पोलीस ठाण्यात महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांच्या तक्रारीवरून बेदम मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष एकनाथ पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या वीज ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांनी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण विभागातील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते (वय ३३), विद्युत साहाय्यक रोशनी पाटले, दिगंबर खंडाळकर, केशव मराठे हे साहाय्यक अभियंता चौधरी यांच्या आदेशावरुन वीज देयक थकीत रक्कम वसुल करण्यासाठी निळजे गावात शुक्रवारी सकाळी आले होते. ग्राहकांना समज देऊन त्यांना थकीत रक्कम तातडीने भरण्याची सूचना पथकाकडून केल्या जात होत्या. एकनाथ लडकू पाटील यांच्याकडे मोठ्या रकमेची वीज देयक थकबाकी होती. त्यांना यापूर्वी पथकाने देयक भरणा करा, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी तंबी महावितरणकडून देण्यात आली होती.
एकनाथ पाटील वीज देयक भरण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने महावितरणच्या पथकाने शुक्रवारी पाटील यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित केला. त्यावेळी घरातून एकनाथ यांचा मुलगा संतोष रागाने बाहेर आला. त्याने तंत्रज्ञ आकाश पराते यांना वीज पुरवठा का तोडला. तो पुन्हा जोडून दे, असे बोलून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या प्रकाराचे मोबाईलमधून व्हिडिओ रोशनी पाटले करत होत्या. त्यांनाही संतोष यांनी शिवीगाळ केली. महावितरणच्या वरिष्ठांना माहिती मिळताच ते निळजे गावात दाखल झाले. त्यांच्या आदेशावरुन संतोष पाटील विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
काही महिन्यापूर्वी मलंग पट्ट्यातील काकोळे गावात महावितरणच्या पथकाला थकबाकीदार ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. हिललाईन पोलीस ठाण्यात ग्रामस्थांविरुध्द गुन्हा दाखल आहे. ग्रामीण भागात बहुतांशी वीज ग्राहक हे वीज वाहिनीवर आकडे टाकून चोरुन वीजेचा वापर करतात. अशा प्रकारे महावितरणचे आर्थिक नुकसान करत असल्याच्या तक्रारी आहेत







