नागपुर (प्रतिनिधी मनोज बाचले) – मागील अनेक महिन्यापासून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागपूर जिल्हय़ातील खाजगी शाळांतील शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नव्हते. ऑगस्ट महिना अर्धा संपूनही जुलै महिन्याचे वेतन होण्याचे चिन्हे दिसत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन वेतनाचा तिढा सोडविण्याची विनंती केली. पालक मंत्र्यानी निवेदनाची दखल घेऊन सर्व संबंधितांना वेतन तात्काळ करण्याचे आदेश दिले.
मागील आठवड्यात जुलै महिन्याचे रखडलेल्या वेतनाबाबत नागपूर जिल्हा शिक्षण समन्वय समिति मार्फत शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना भेटून वेतनाबाबत माहिती विचारली असता कोषागार कार्यालय अधिकारी यांनी जिल्हय़ातील अधिसंख्य पदावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी व अन्य काही आक्षेप नोंदविल्याने त्याची पूर्तता लगेच करुन दोन दिवसात वेतन करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी श्री. पटवे यांनी दिले होते. परंतु अर्धा महीना संपूनही जुलै महिन्याचे वेतन झाले नाही. विशेष म्हणजे इतर जिल्हय़ात अधिसंख्य पदाबाबत कोणतेही आक्षेप कोषागार कार्यालयाने घेतले नसल्याने शिक्षकांचे वेतन झाले. फक्त नागपूर जिल्ह्य़ासाठीच कोषागार कार्यालयाकडून आक्षेप का घेतल्या जात आहे असा प्रश्न शिक्षकांना पडला. सणासुदीच्या काळात कोषागार व वेतन पथक यांच्या कैचीत शिक्षकांचे वेतन अडकल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. त्यामुळे आज शिक्षण समन्वय समितीच्या वतीने जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना भेटून वेतनाबाबतचा घोळ मिटविण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी कोषागार अधिकारी, वेतन पथक अधीक्षक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची सभा बोलावून वेतनाबाबतच्या अडचणी समजून घेतल्या. कोषागार कार्यालयाच्या आक्षेपाच्या निराकरणाचे पत्र वेतन पथक कार्यालयाकडून प्रत्यक्ष पालकमंत्र्यासमक्ष सादर केले. त्यावर कोषागार कार्यालयाच्या वतीने समाधान झाल्याचे सांगून सोमवारला वेतन अदा करण्याची हमी दिली. शिक्षकांच्या वेतनाचा सुरू असलेला घोळ समक्ष सोडवून घेतल्याने पालकमंत्र्यांचे समन्वय समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी शिक्षण समितीचे मुख्य संयोजक अनिल गोतमारे, पुरुषोत्तम पंचभाई, जयंत जांभुळकर, अशोक गव्हाणकर, बाळा आगलावे, सपन नेहोत्रा , नामा जाधव, अभिजित पोटले, भरत रेहपाडे, सुभाष गोतमारे, सुधीर वारकर, अरुण भोयर, सुनील मने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.







