मुंबई (प्रतिनिधी प्रमिला जाधव) – भायखळा नागरिक सुधार समितीच्या वतीने पॅलेस सिनेमा, भाजी मार्केट,भायखळा पुर्व येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विभागातील नागरिकांनी आणि माजी आमदार मधु चव्हाण यांनी सहभाग घेऊन ध्वजरोहाणाचा कार्यक्रम अतिशय सन्मानपूर्वक पार पाडला . देशातील धर्मांतराचा पूर्णता नायनाट करून देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्याचे आवाहन त्यांनी केले. देशातील सर्व धर्म समभाव कायम राखून हिंदू, मुस्लीम, सिख, इसाई हम सब है भाई भाई या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही समाजात काम करत आहोत. या देशामध्ये शांतता, कायदा आणि सुव्यवस्था टिकवली पाहिजे असे आवाहन मधु चव्हाण यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. देशातील जनतेमध्ये शांतता,सलोखा,एकोपा टिकून राहावा. देशातील शांततेला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये असे आवाहन याठिकाणी अनेक मान्यवरांनी केले. या समारंभात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, काँग्रेस युवा नेते समीर चव्हाण,मतदार चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक केतन खेडेकर, समाजसेवक शामिम अन्सारी,उमेश साळवी , संदीप कांडके,मिलिंद घोडेकर अनिकेत घाडीगावकर आणि असंख्य एनसीसीचे विद्यार्थी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







