महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई (संपादक सुनिल पाटील) : सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतात उभा असलेला पिकांचा घास पूर्णपणे वाया गेला आहे. मेहनतीने उभारलेले पीक, घामाचा दाणा आज वाहून गेला. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. आधीच हमीभावाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आता ओल्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत, या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस शेतकरी एल्गार मेळाव्याचे येत्या १३ व १४ ऑक्टोबरला आयोजन करणार आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यासोबतच शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे यासाठी १३ ऑक्टोबरला नाशिक जिल्ह्यात मंजुळा मंगल कार्यालय, वडनेर भैरव येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या महाएल्गार मेळाव्याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते होणार असून, या मेळाव्याला माजी मंत्री तथा राज्य आणि विधानसभा समूह नेते बाळासाहेब थोरात, भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक यांची उपस्थिती राहणार आहे.
१४ ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात भव्य शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन ओंकार गार्डन मंगल कार्यालय, उमरी रोड, मुदखेडा येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यक्रम अध्यक्ष अलका लाम्बा, लोकसभा सदस्य डॉ.शिवाजीराव कालगे, विधानसभा सदस्य माधवराव पाटील, विधानपरिषद सदस्या प्रज्ञा सातव, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटना एस.के. पाटील, आयोजक पश्चिम महाराष्ट्र विश्वंभर बाबर आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस अध्यक्ष पराग पष्टे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव राम कुऱ्हाडे, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस उपाध्यक्ष दामिनीताई ढगे, जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुभाष पाटील, महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस सचिव सोफिया खान, महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेस उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रभारी सुनिल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.







