पुण्यात तिघांकडून पत्नीवर लैंगिक अत्याचार, पतीनेच केलं व्हिडीओ शूटिंग

gangrape
File Photo

पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : पिंपरी चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह चार जणाविरोधात रावेत पोलिसांनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पुनावळे परिसरात राहणाऱ्या एका विवाहीत महिलेने रावेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर ( ३० वर्ष) असून ती विवाहीत असून, पतीसह पुनावळे परिसरात राहते. पीडित महिलेसह तिचा पती आणि सर्व आरोपी उच्चशिक्षित असून एका मोठ्या कंपनीत काम करतात. पीडित महिलेवर तिघांनी वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार केला, या घटनेतील धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या पतीनेच त्या तिघांकडून आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करवून घेतला आणि त्याने या संपूर्ण अत्याचाराच्या क्षणांचे व्हिडीओ शूटिंग मोबाईलमध्ये केलं, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

 

त्यानंतरही तिच्या पतीला दया आली नाही, उलट त्याने त्याच्या पत्नीला हे अत्याचाराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्यानंतर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्यही केलं. सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत पीडितेसोबत हा सर्व प्रकार घडला. त्या महिलेने पतीला विरोध केला असता, त्याने तिला शिवीगाळही केली. पती-पत्नीमध्ये बरेच वाद सुरू आहेत. अखेर त्या महिलेने रावेत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेला सर्व प्रकार कथन केला आणि पती व त्या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्या महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह एकूण चार जणांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here