कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या

kalyan-police

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : रेल्वे प्रवाशांसोबत सलगी करून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांना बिस्किटमधून गुंगीचे औषध खाण्यास देवून नंतर प्रवासी गुंगी येऊन पडला की त्याच्या जवळील किंमती ऐवज किंवा त्याच्या पिशवीतील रोख रक्कम, मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. रामसुरत रामराज पाल (४६) असे आरोपीचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो सध्या भिवंडी येथे वास्तव्यास आहे. भिवंडीत राहून तो कल्याण ते मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या पिशव्या, मोबाईल चोरण्याचे धंदे करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१५ ऑक्टोबर) एक प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर उभा होता. त्याला उत्तर प्रदेशात जायचे होते. त्याच्या जवळ एक ते दोन पिशव्या होत्या. तो प्रवासी उत्तर प्रदेशात जाणाऱ्या एक्सप्रेसची वाट पाहत उभा होता. आरोपी रामसुरत याने त्या प्रवाशाजवळ जाऊन तू कोठे चालला आहेस, अशी विचारणा केली. त्याने आपण उत्तर प्रदेशात चाललो आहोत, असे सांगितले. रामसुरतने मीही उत्तर प्रदेशातील असून तेथेच जाणार आहे, असे स्पष्ट केले.

रामसुरतने त्या प्रवाशाशी मैत्री केली. त्याला भूक लागली आहे असे बोलून आरोपी रामसुरत याने स्वत:जवळील बिस्किट काढून खाण्यास सुरुवात केली. याच दरम्यान प्रवाशाची नजर चुकवून रामसुरतने प्रवाशाला द्यायच्या बिस्किटला गुंगीचे औषध लावून ते प्रवाशाला खाण्यास दिले. तेवढ्यात प्रवाशाला तात्काळ गुंगी येऊन त्याचे डोके जड झाले. त्याला उलटी, मळमळ सुरू झाली. प्रवासी बसल्या जागीच चक्कर येऊन कोसळला.

या संधीचा गैरफायदा घेत रामसुरतने प्रवाशाची पिशवी उचलून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी गस्तीवरील रेल्वे पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने रामसुरतला रोखून पिशवी कोणाची आहे? अशी विचारणा केली. रामसुरतची बोबडी वळली. पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तातडीने रामसुरतला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची कसून चौकशी करताच त्याने आपण एका प्रवाशाला बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन त्याची पिशवी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. सध्या पोलिसांनी रामसुरतवर गुन्हा दाखल करत अशाप्रकारे किती चोऱ्या केल्या आहेत याचा तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here