लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारने योजनेचा निधी थांबवला

ladaki-bahin

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. म्हणजेच, लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे.

आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे विभागाकडू या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here