ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचा सर्वांगिण विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडविणे हे उद्दिष्ट घेऊन स्थापन झालेल्या लोकराज्य पक्षातर्फे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक यांची सामाजिक मोट बांध महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या ५० विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमातींचे संख्याबळ असेल अशा निवडक ४० ते ५० विधानसभा मतदारसंघातून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.
विविध जाती, जमाती, धर्म, पंथ, परंपरांनी समृध्द असलेल्या व विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात लोकशाहीची संवैधानिक मुलतत्वे जोपासून सामाजिक ध्रुवीकरण व संघटन करणे तसेच तळागाळातील अन्यायग्रस्त जातीजमातींमध्ये राजकीय सजगता व समाजाभिमुख वैचारिक ध्येयधोरणे व संवैधानिक विचारधारा निर्माण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या तळागाळातील समाजाला सुदृढ व बलशाली करून त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक व आर्थिक विकास साधला जावून राष्ट्रक्रांती होऊ शकेल असा पुरोगामी विचार लोकराज्य पार्टीचा आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या ५० विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जाती जमातींचे संख्याबळ असेल अशा निवडक ४० ते ५० विधानसभा मतदारसंघातून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यासाठी विविध मागासवर्गीय समाजांसोबत व सर्वच समविचारी सामाजिक पक्षांसोबत युतीच्या माध्यमातून मतांचे ध्रुवीकरण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.







