सातारा (प्रतिनिधी) : घरफोडीचे तीन गुन्हे उघड करून १ लाख ९ हजार १०० रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करत राजेश गणेश वंजारी (वय ३९ रा. ४५ गुरुवार पेठ सातारा), धनंजय राजेंद्र पंडित (वय ३८, रा. ४५, गुरुवार पेठ, सातारा) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती शाहुपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली.
९ ऑक्टोबर २०२४ रोजी घरफोडीची तक्रार शाहुपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र नवले, राजेंद्र सावंत्रे यांनी केल्या होत्या. यानंतर २२ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार घोरपडे करणारे आरोपी हे कामाने हौद परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी त्यांना आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली.
चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कुमार ढेरे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, निलेश पाटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे संग्राम फडतरे, महिला पोलिस अंमलदार तनुजा शेख यांनी ही कारवाई केली.







