नागपूर (प्रतिनिधी) : चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराने हवालदारावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वाठोडा ठाण्यातील पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतरही जीव धोक्यात घालून त्याने चाकू हिसकावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच तेथून पळालेल्या त्याच्या साथीदारालाही पाठलाग करून पकडण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी अतुल शेंडे (वय ४५) आणि चेतन बुरडे (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत साईबाबानगरात घडली. आरोपी अतुल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर २ खुनांसह एकूण २४ गुन्ह्यांची नोंद आहे. २०११ आणि २०१९ मध्ये त्याच्यावर खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर आरोपी चेतन हा कुख्यात घरफोड्या असून, त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे आहेत.
वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत साईबाबानगर येथे यादव यांचे घर आहे. मागील चार महिन्यांपासून घराला कुलूप आहे. आरोपींनी घराची रेकी करून मध्यरात्री घरफोडीची तयारी केली. त्यांनी घरात चोरी केली आणि पळून जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान, वाठोडा पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली. हवालदार फारूक आणि सुभाष हे दोघेही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच चेतन पळाला. त्याला पकडण्यासाठी दोघेही धावले. मात्र, फारूकला घटनास्थळी कोणीतरी असल्याचा भास झाल्याने ते तेथेच थांबले, गेटच्या आतमध्ये अतूल होता. फारूखने त्याला बाहेर येण्यास म्हटले. आरोपीने शिवीगाळ करीत धारदार शस्त्र काढले. भिंतीवरून उडी घेत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
दरम्यान, फारूख यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता चाकूने वार केला. रक्तबंबाळ असतानाही फारूख यांनी आरोपीला ताकतीनीशी ढकलून खाली पाडले आणि त्याच्या हातातील चाकू हिसकावला. पुढील धोका लक्षात घेत आरडा ओरड केली.







