मुडा प्रकरणात ईडीचे छापे; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यासह कुटुंबियावर गुन्हे दाखल

ईडी

बेंगळुरू (वृत्तसंस्था) : म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरिटी अर्थात ‘मुडा’मधील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ईडीने सोमवारी आणखी काही ठिकाणी छापे मारले. ईडीने याच प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

बेंगळुरू आणि म्हैसूरमधील सुमारे सात ते आठ ठिकाणी छापेसत्र सुरू आहे. त्यात बेंगळुरूमधील एक बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्याशी संबंधित अन्य व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘मुडा’तील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने १८ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात म्हैसूरस्थित ‘मुडा’चे कार्यालय आणि अन्य ठिकाणी छापे मारले होते. तसेच, गेल्या आठवड्यातच ‘मुडा’च्या बेंगळरूतील विभागीय कार्यालयातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली होती.

 

लोकायुक्तांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची दखल घेऊन ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहारविरोधी कायदा (पीएमएलए) अंतर्गत माहिती अहवाल (ईसीआयआर) सादर केला आहे. मुडाद्वारे पत्नीला १४ भूखंडाचे वाटप करण्यात आलेल्या कथित अनियमिततेप्रकरणी सिद्धरामय्या यांची लोकायुक्त आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. लोकायुक्तांनी नुकतीच सिद्धरामय्या यांची पत्नी बी. एम. पार्वती यांचीही चौकशी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here