ठाणे (महाराष्ट्र राज्य क्राईम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वन्नम) : राज्यभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असतांना ठाण्यातील कासारवडवली परिसरातील हिरानंदानी इस्टेटमधील पेनिकल या इमारतीच्या २२ व्या मजल्यावरुन उडी टाकून एका महिलेने आत्महत्या केली. संबंधित महिला ही या इमारतीमध्ये काम करण्यासाठी आली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघबीळ परिसरात रहाणारी ही महिला हिरानंदानी इस्टेटमधील पेनिकल इमारतीमध्ये एका रुग्णाला मसाज करण्यासाठी आली होती. त्यामुळे तिच्याकडे पेनिकल इमारतीत प्रवेश करण्यासाठीचे अॅक्सेस कार्ड होते. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ती पेनिकल इमारतीमध्ये रुग्णाला मसाज करण्यासाठी आली होती. यानंतर ती एक्सेस कार्डचा वापर करुन २२ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. याठिकाणी तिने पायऱ्यांवर बसून गुटखा खाल्ला. यानंतर ती या मजल्यावरील रेफ्युज फ्लॅटमध्ये गेली आणि तिकडून खाली उडी टाकली.
या महिलेचा पती किडनीच्या विकाराने त्रस्त होता. तर तिच्या मुलालाही डोळ्यांचा विकार होता. या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. या सगळ्यामुळे ही महिला प्रचंड नैराश्यात होती. याच नैराश्याच्या भरात महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आला. आता पोलीस या घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.







