सांगली (प्रतिनिधी) : संजयनगरमधील गांधी कॉलनी येथे मोपेडवरून गांजा घेऊन चाललेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा गांजा, एक लाखाची मोपेड असा ३ लाख ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
इनाममुलहसन बाबासाहेब शेख (वय २८) व अरमान मिरासाब शेख (२०, रा. राजीव गांधी कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना गांजा पुरवणारा अरबाज ऊर्फ इप्तेखार बाबासाहेब शेख हा पसार झाला. पोलिसांच्या पथकाला दि. ५ रोजी जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळून मोपेडवरून गांजा विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने गांधी कॉलनी परिसरात सापळा रचला. पथकाला मोपेडवरून दोघेजण येताना दिसले. पथकाने संशयावरून त्यांना थांबवले. त्यांच्या मोपेडवर असलेल्या पिशवीची तपासणी केली असता गांजा मिळून आला. गांजा कोठून आणला याची चौकशी केली असता, इनाम मुल हसन याने त्याचा भाऊ अरबाज याच्याकडून गांजा आणला असून, तो विक्रीसाठी घेऊन चालल्याचे सांगितले.







