मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – स्वातंत्र दिनानिमित्ताने मुंबईच्या चेंबूर भागातील आनंद नगरमध्ये पोलीस कुटुंबियांकडून दोनशेहून अधिक दिव्यांग व विधवा, निराधारांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले राजेंद्र घोरपडे व त्यांचे कुटुंबीय लॉकडाऊनच्या काळात आपल्या यथाशक्तीप्रमाणे गोरगरिबांना मदतीचा हात देत आहेत. गोवंडी पोलीस ठाण्यात मिल स्पेशल म्हणून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेंद्र घोरपडे व त्यांचे कुटुंबीय गेल्या चार महिन्यांपासून स्वखर्चाने मोफत अन्नधान्य वाटप करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या कौटुंबिक बचतीतून २५ हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुद्धा दिली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यावर आलेल्या या अडचणीसाठी छोटीशी मदत म्हणून स्वातंत्र्यदिनी अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. याप्रसंगी गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेंबूर तालुकाध्यक्ष दीपक सावंत यांची उपस्थित होती.









