मुंबई (वृत्तसंस्था) : जैश ए मोहम्मद कट्टरतावाद प्रकरणी एनआयएनं देशभरात कारवाई करत, अमरावती आणि भिवंडीतून दोघांना ताब्यात घेतलं आहे. एनआयएनं भिवंडीतील खोणी गावातून कामरान अंसारी या तरुणाला तर अमरावतीच्या छाया नगर परिसरातून एका तरुणाला एनआयएनं ताब्यात घेतलं. मात्र या तरुणाचं नाव अद्याप जाहीर केलेले नाही.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२३ रोजी एनआयए पथकानं नोंदवलेल्या इसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात पाच ठिकाणी संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. त्यावेळीही एनआयए पथकानं आरोपींच्या घराच्या झडती वेळी काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित अनेक कागदपत्रं यासारखी अनेक गुन्हे करणारे साहित्य जप्त केले होते. जप्त केलेल्या साहित्याने आरोपींचे इसिस या दहशतवादी संघटनेशी सक्रिय संबंध आणि दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंडा पुढं नेण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे समोर आल्याचं सांगण्यात आलं.
एनआयएच्या पथकानं गुरुवारी पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोणी ग्रामपंचायत भागातील एका खोलीवर अचानक छापा मारला. यादरम्यान कामरान अंसारी याला ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेण्यात आलेला कामरान हा अनेक दिवसापासून याच खोलीत राहत असल्याचं तपासात समोर आलं आहे. आज पहाटेच्या सुमारास अमरावती मध्येही एनआयएच्या पथकानं छापेमारी करुन एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
गेल्या वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक आणि दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. शिवाय मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षात संशयिताना ताब्यात घेऊन अटक केली. तर २०१४ साली कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये भरती झाले. त्यामुळे ठाणे जिल्हयात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचं पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील खोणी गावातून समोर आल्याचं दिसून येत आहे.







