मालदा (वृत्तसंस्था) : पश्चिम बंग़ालच्या मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेत तृणमूलचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. कालियाचक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कालियागंज परिसरात ही घटना घडली. तृणमूलचे स्थानिक समितीचे अध्यक्ष बकुल शेख कालियाचक परिसरात एका रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्याक्रमाला गेले होते. त्यावेळी तृणमूलचे अन्य कार्यकर्ते त्यांच्यासमवेत होते.
त्यावेळी चार ते पाच हल्लेखोर तेथे आले आणि त्यांनी शेख आणि त्याच्या साथीदारांवर बेछूट गोळीबार केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.या हल्ल्यात अताउल हक उर्फ हसू शेख या तृणमूलच्या नेत्याचा जागीच मृत्यू झाला. तर, बकुल शेख आणि माजी पंचायत प्रमुख एसारुद्दीन शेख गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर तिघांनाही मालदा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शेख यांना मृत घोषित केले. तर, अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले.
कालची घटना पक्षांतर्गत गटबाजीतून झाली असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या हल्ल्यामागे बांगलादेशी घुसखोरांसह बाह्य शक्तींचा हात असू शकतो, असे नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्णेंदू नारायण चौधरी सांगितले.







